Monday, May 30, 2016

मराठी विज्ञान परि़षद पुणे कार्यक्रम अहवाल २०१६-१७ Marathi Vidnyan Parishad Pune Programs Reports 2016-17


सर जगदिशचंद्र बोस यांचा जन्मदिवस साजरा
मुक्तांगण विज्ञान शोधिका, पुणे येथे शनि 2 डिसेंबर 2017 रोजी रेडिओचे जनक सर जगदिशचंद्र बोस यांचा जन्मदिवस साजरा केला. या कार्यक्रमाचे सहआयोजक मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग होते.

श्री अब्दुर रहमान, पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी वायरलेस) मुख्य अतिथी होते. त्यांनी आय.आय.टी. कानपुर येथून 1997 साली इंजिनियर पदवी प्राप्त केली. त्यांच्या हस्ते मुक्तांगण विज्ञान एक्सप्लोरेटरीच्या हॅम रेडियो क्लबचे उद्घाटन झाले. सक्रिय पुणे हॅम अर्थात व्हीयू 2 एमएसबी, मिलिंद, व्हीयू 3 यू बी यू श्रीपाद आणि व्हीयू 3 यूजो हजर होते. कौस्तुभने हॅम रेडियो सर्व उपस्थितांना दाखविले. ओम मिलिंद यांनी क्यूएसएल कार्ड सर्वांना खुले करत हॅम रेडियोचे विविध पैलू समजावून सांगितले. श्रीपाद आणि कौस्तुभ यांनी व्हिएचएफ कसे कार्य करते ते दाखविले. कौस्तुभने घरी बनवलेली मोर्स कळ वापरून प्रात्यक्षिक दाखविले. उपस्थित विद्यार्थ्यांना मोर्सवर ईआयएसएच आणि टिएमओ मुळाक्षरे कशी उमटवायची याचे प्रात्यक्षिक दाखवले. हा त्यांच्यासाठी एक रोमांचकारी अनुभव होता.

वायरलेस उपमहानिरीक्षक अब्दुर रहमान यांनी महाराष्ट्रात पोलीसांच्या बिनतारी संपर्कजाळ्याबद्दलची माहिती दिली. पुण्यातील इनोवेशन हबची उभारणी प्रक्रियेत आहे त्यात संवाद समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी पुणे हॅमचे सहकार्य हवे आहे असे ते म्हणाले. विशेषत: गुन्हेगारांचे मोबाइल फोन ओळखण्यात अडचणी येतात तेथे हॅम मदत करू शकतात.

विद्यार्थी आणि विज्ञान प्रेमींना उत्तम प्रतिसाद अपेक्षेबाहेर चांगला मिळाला. 60 हून अधिक विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. पुण्याजवळील खोडद येथील अवाढव्य मीटर रेडीओ दुर्बिण ज्यांनी बांधली ते पद्मश्री डॉ गोविंद स्वरूप कार्यक्रमाला हजर होते. त्यांनी मॉन्ट्रियल विज्ञान परिषदेच्या आठवणी सांगितल्या. या परिषदेत रेडिओचा जनक मानल्या जाणाऱ्या मार्कोनीचे नातूंनी रेडिओचे सर्व श्रेय जगदिशचंद्र बोस यांना खुलेपणाने दिले. मार्कोनीने सर जगदिशचंद्र बोसचा कोहेरर वापरला होता हे त्यांनी आपल्या टिपणात लिहिलेल्याती एक नोंद आढळून आल्याचे मार्कोनी यांच्या नातवाने सांगितले.

बिनतारी लहरींच्या शोधांबाबत इतर वैज्ञानिकांपेक्षा सर जे.सी. बोस 60 वर्षे पुढे होते. मार्कोनीच्या पुष्कळ आधी त्यांनी गन पावडरच्या ज्वलनाचा वापर करून सूक्ष्मलहरी (मायक्रोवेव्ह) प्रक्षेपित करून रेडिओ लहरींचे अस्तित्व सिद्ध केले होते. बोस रेडिओचे आविष्कारक आहेत आणि मार्कोनी नाहीत हे आता जगाने स्विकारले आहे. सर जेसी बोस यांच्या मायक्रोवेव्ह रेडिओ प्रयोगांची प्रतिकृती जीएमआरटीचे तंत्रज्ञ श्री सुधीर फाटककर यांनी सर्वांना दाखवली. सर जेसी बोस यांच्या या प्रयोगाचा पुरेसा पाठिंबा मिळाला नव्हता आणि खूप दर्जेदार अशी साधनेही त्यांच्याकडे नव्हती तरीही त्यांनी वापरलेला प्रक्षेपक आणि संवेदक आजही कार्य करतो आहे हे पाहून उपस्थितांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. हे दर्शन विद्यार्थ्यांना प्रेरणादायक वाटले.

बिनतारी लहरींच्या कार्यात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांविषयी श्री विश्वास काळे यांनी थोडक्यात सादरीकरण केले. त्या दिवसात बिनतारी यंत्राद्वारे पाठवलेल्या संदेशांना मार्कोनीग्राम असे नाव देण्यात आले होते असे टायटॅनिक जहाजाच्या कागदपत्रांमधून आढळून आले.

मुक्तांगणचे संचालक आनंद भिडे, संदीप नाइकर, नंदकुमार काकिर्डे, मराठी विज्ञान परिषदेचे संजय मा. क., यशवंत घारपुरे अन्य सभासद, विलास रबडे व्हीयू 2 वीपीआर तसेच मुक्तांगणचे कार्यकर्ते यांनी या वैज्ञानिक कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.

या वर्षी जगदीश चंद्र बोस यांची जन्मशताब्दी आहे, त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्याची संधी आहे. भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया जगदीश चंद्र बोस यांनी घातला. त्यांच्या प्रेरणेतून अनेकांनी त्या दृष्टीने काम केले. त्यांच्या कार्याच्या टिपणांचे बारा ग्रंथ कोलकत्ता येथील बोस इंस्टिट्यूट मध्ये प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. त्या बरोबर भारतीय विज्ञानाची वाटचाल कशी झाली याचे एक कायम स्वरूपी प्रदर्शनही मांडले जाणार आहे.




जाहीर व्याख्यान
इन्स्टिट्यूट आँफ इंजिनिअर्स, पुणे केंद्र आणि मराठी विज्ञान परिषद, विभाग पुणे
यांचा संयुक्त कार्यक्रम  
 मंगळवार. दिनांक १९/०९/१७ वेळ- सांयकाळी ६.१५ वाजता
 विषय- धरण,तलाव,नद्या पुनर्जिवित करण्यात यंत्र मानवाचा उपयोग
 वक्ते- असीम भालेराव
 ठिकाण- इंस्टीट्युशन ऑफ इंजिनिअर्स स गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता शिवाजी नगर पुणे -५

नदी नाले गटारे वाहती ठेवण्यासाठी ड्रोन आणि रोबोंची मदत
“विविध प्रकारच्या वाढत्या जलप्रदूषणापासून आपल्या नदी-नाल्यांची आणि सांडपाण्याच्या गटारांची योग्य देखभाल करण्यासाठी ड्रोन आणि रोबो यांचा वापर करावा. त्यामुळे निगराणीचे काम योग्य प्रकारे, अचूक आणि किफायतशिरपणे करता येईल” असे उदगार असीम भालेराव यांनी काढले. मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, पुणे सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात असीम भालेराव बोलत होते. अशा प्रकारचा काम करणारा रोबो त्यांनी स्वत: विकसित केला आहे. मुंबईत ड्रोनच्या माध्यमातून मिठी नदीचे सर्वेक्षण करून नदीच्या खाचखळग्यांसह बारकाव्याने काढलेला नकाशा नदीपात्रातील प्रवाह वाहण्यासाठी कसा वापरता येईल हे त्यांनी दाखविले. एका बाजूने ड्रोनच्या माध्यमातून हवाई छायाचित्रण करायचे आणि रोबोचा वापर प्रवाहाच्या आत करून आतले ही चित्रण करायचे, त्याबरोबरच नदीला मिळणारे नैसर्गिक जलस्रोत आणि मानव निर्मित मलनिस्सारण यंत्रणांच्या आत काय बिघडले आहे ते शोधण्यासाठी रोबोंचा वापर करायचा असे हे तंत्र आहे. स्वच्छ पाण्यात इन्फ्रारेड किरणांच्या आधारे छायाचित्रण करतात तर गढूळ पाण्यात मायक्रोवेव्ह वापरून छायाचित्रण केले जाते. रोबोच्या निरीक्षणांचे संगणकीय विश्लेषण केले जाते. त्यामुळे आतील रचनेत कोणता बिघाड आणि नेमका कुठे झाला आहे हे नक्की करता येते. गटारीमध्ये माणसाला उतरावे लागत नाही, त्यामुळे अशा माणसांच्या आरोग्याला आणि जीवाला असलेली जोखीम घ्यावी लागत नाही. गटारीच्या आतील अडथळे नेमके कुठे आहेत, किती आहेत, कशाचे आहेत, केवढे आहेत हे समजल्यामुळे ते कमीतकमी कष्टात, कमीतकमी वेळात आणि कमीत कमी पैशात दूर कसे करता येतील याचा निर्णय घेणे सोपे जाते. अनेकदा जमिनीखालील जलवाहीन्या तसेच गटारे यांचे नकाशे उपलब्ध नसतात तेव्हा तुंबलेल्याची सफाई करणे हे काम सोपे राहत नाही. पुणे येथील एका घटनेत एक गटार जबर तुंबले आणि त्यातले मैलापाणी सगळीकडे वाहू लागले. त्यात संबंधित नकाशे उपलब्ध नव्हते. मेन होल रस्याच्या ज्या बाजूला होते त्या बाजूचा रस्ता खंदून काढून तुंबलेल्या गटारीतील पाण्याचा निचरा करण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न झाला. पण त्याला यश आले नाही. मग रोबोला वाहत्या गटाराच्या आत सोडून पाहणी केली तेव्हा गटारीच्या जोडण्या रस्त्याच्या विरूद्ध बाजूला असल्याचे आढळले. ड्रोनचा वापर करून पात्र बदलणाऱ्या नद्यांच्या पुराच्या स्थितीचे पूर्वअनुमान करता येईल जीवीत व वित्त हानी थांबवता येईल. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि आभार प्रदर्शन मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष विनय र. र. यांनी केले. वक्त्यांचा सत्कार इंस्टिट्यूटचे सेक्रेटरी अविनाश निघोजकर यांनी केला. यावेळी वसंत शिंदे, म. ना. गोगटे, संजय मा. क., राजेंद्र सराफ इत्यादी मान्यवर आणि या क्षेत्रातील इंजिनिअर्स उपस्थित होते.
शब्दांकन विनय र. र. कार्यक्रम १९ सप्टेंबर २०१७ संध्या ६:३० ते ८:३०. स्थळ – फिरोदिया सभागृह
         




जागतिक ध्वनिप्रदूषण दिन
-------------------------------

ध्वनिप्रदूषण मानवाचा अप्रत्यक्ष शत्रू

डॉ. यशवंत ओक यांचे प्रतिपादन; टीएमसी व मविपतर्फे ध्वनिप्रदूषण जनजागृती कार्यक्रम


पुणे : "वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारासह झोपमोड, ताण-तणाव, अशक्तपणा, गर्भावर दुष्परिणाम, मन एकाग्र करण्यात अडचणी येतात. त्यातून जीवनातील शांतता भंग होऊन मनोरुग्ण होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषण हा मानवाचा अप्रत्यक्ष शत्रू आहे, हे समाजाने समजून घेतले पाहिजे व ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी योगदान दिले पाहिजे," असे प्रतिपादन ध्वनिप्रदूषण जनजागृती मोहिमेचे प्रणेते आणि ध्वनि प्रदूषणाचे अभ्यासक यशवंत ओक यांनी केले.

टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियम (टीएमसी), पुणे आणि मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ध्वनीप्रदूषण जनजागृती दिनानिमित्त घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. यशवंत ओक बोलत होते. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, टीएमसीचे अध्यक्ष बाहरी बी. आर. मल्होत्रा, सरचिटणीस डॉ. जे. जी. पाटील, मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे आदी उपस्थित होते.
डॉ. यशवंत ओक म्हणाले, "नको तेव्हा नको तेथे नको तो आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण. मोठ्या आवाजातले वाॅकमन, इअरफोन वापरणाऱ्याला याचा धोका अधिक आहे. त्याचबरोबर दिवाळीतील फटाके, ऊत्सवातली डीजे, लाऊडस्पीकरवरील आवाजाची पातळी सहनशक्तीच्या पलिकडे पोचते. त्यातून दम्याचे, रक्तदाबाचे, हृदयविकाराचे आजार बळावतात. ऐकण्याच्या समस्या उद्भवतात. अनेक नेतेमंडळींच्या विजयी मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. आवाजातून त्यांची 'पॉवर' दाखविण्याची पद्धत समाजाला घातक आहे. लहान मुलांवर अशा कर्णकर्कश आवाजाचा दूरगामी परिणाम होतो. त्यामुळे प्रार्थनेवेळी भोंगा, उत्सवातील डीजेचे आवाज, फटाक्यांचे आवाज, इमारतीचे बांधकाम करताना होणारे आवाज टाळता येऊ शकतात. त्याबाबत विचार केला पाहिजे." 

वय आणि बहिरेपण याचा काही संबंध नाही. आदिवासी क्षेत्रात ध्वनीप्रदूषण नसल्याने तेथील ७०-८० वर्षांच्या लोकांनाही २० वर्षांच्या शहरी तरुणाइतके स्पष्ट ऐकू येते. आवाज हा आपल्या आयुष्यातला रोजचा भाग असल्याचे सांगत ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम होतात हे मानायला लोक तयार नसतात. ही मानसिकता बदलायला हवी, असेही डॉ. ओक यांनी नमूद केले.


'स्मार्ट सिटी, सायलेंट सिटी, पुणे सिटी' या संकल्पनेवर सादरीकरण करताना 
​​
संजय राऊत म्हणाले, "वाहन चालविताना हॉर्न वाजविण्याची गरज नाही. परंतु काही लोक आजार झाल्यासारखे हॉर्न वाजत जातात. त्यामुळे चिडचिड वाढते, अपघात टाळण्यासाठी मदत होते. शिवाय, त्यातून उद्भवणारी भांडणेही होत नाहीत. परिवहन विभागाचे हॉर्न वाजविण्याबाबतीत नियम असले, तरी आपण स्वयंशिस्तीने वागले पाहिजे. व नियंत्रित वेग व हॉर्न न वाजवता गाडी चालविली तर, सुरक्षित आणि शांत प्रवास होऊ शकतो." यावेळी डॉ. ओक यांनी ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी शपथ दिली.

बाहरी बी. आर. मल्होत्रा यांनी ध्वनिप्रदूषण निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टींवर बंदी घालता येणार नाही, मात्र, ते रोखण्यासाठी जनजागृतीद्वारे प्रयत्न केले गेले पाहिजेत, असे सांगितले. डॉ. जे. जी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत घारपुरे यांनी आभार मानले.
जागतिक जल दिन कार्यक्रम
मंगळवार 18 एप्रिल 2017 सायंकाळी 6.30 वाजता
स्थळ - इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (भारत), पुणे स्थानिक केंद्र, शिवाजीनगर, पुणे ५

* जल संपदा, पुणे;  * केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र, पुणे;  * राष्ट्रीय जल अकादमी, पुणे;
* भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा;  * भारतीय जलसंपदा सोसायटी, पुणे;  
* भारतीय जलकामे असोसिएशन, पुणे केंद्र; * पर्यावरण शिक्षण, संशोधन व व्यवस्थापन संस्था (सीरम), आणि * मराठी विज्ञान परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने

कार्यक्रम - उद्घाटन, कलश पूजन,
स्वागत - अध्यक्ष गिरीश मुंदडा
विषय मांडणी - आर व्ही सराफ
हवामान बदल शमनासाठी जलसंसाधने - संरक्षण, जोपासना व वापर - या विषयावर परीचर्चा
( उपविषय - भूजल संसाधने आणि हवामान बदल, जलसंपदा आणि हवामान बदल स्थिती, जलसंपदा आणि संरक्षण) 
सदस्य - आर व्ही सराफ, आर सी माहूलकर, टी एन मुंडे, सुनील पाटील, डॉ एम के सिन्हा, डॉ आर के श्रीवास्तव, डी बी पानसे, राजेंद्र माहूलकर
आभार प्रदर्शन अविनाश निघोजकर, सूत्र संचालन – रुचा नरवदे


स्रोत’ आणि ‘मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
१६ एप्रिल या आंतरराष्ट्रीय आवाज दिनाच्या निमित्ताने
एक अनोखा उपक्रम

“ आवाज  विज्ञानातला आणि संगीतातला 
दिनांक १७ आणि १८ एप्रिल २०१७, रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७
पंडीत जवाहरलाल नेहरू कला दालन, घोले रस्ता, शिवाजीनगर, पुणे ५
(म. फुले वस्तू संग्रहालयाच्या समोर)

v  उद्‍घाटन सोमवार दि. १७ एप्रिल सकाळी ११ वाजता –
v  उद्‍घाटक डॉ. मिलिंद वाटवे – आयसर, पुणे या संशोधन संस्थेतील अग्रगण्य संशोधक, सायन्स कट्टा संकल्पनेते उद्‍गाते

‘कान’ आणि ‘आवाज’ असणाऱ्या
लहान-मोठ्या वयोगटीतील प्रत्येकाला एक अनोखा अनुभव देणारा असा हा उपक्रम आहे. तुम्ही विद्यार्थी असाल किंवा पालक, शिक्षक असाल तर यातील अनुभव तुमचे ज्ञान नक्कीच वाढवतील.
तुम्हाला संगीतात गोडी वाटेल आणि विज्ञानाची ओढही वाढेल.
येथे तुम्हाला कित्येक प्रश्नांची उत्तरे अनुभवायला मिळतील
• आवाज कसा निर्माण होतो? • स्पंदन म्हणजे काय? • आंदोलनांची वाटचाल कशी असते?  • लहर म्हणजे काय? 
• आवाज कसा पसरतो? • ध्वनीचे गुणधर्म कोणते? • आवाजाचा प्रतिध्वनी कसा येतो? • वाद्यांची सुरावट कशी असते? • •आपले म्हणणे मांडण्याचे प्रभावी साधन म्हणजे आपला आवाज तो येतो कसा? मानवी आवाजात विविधात का असते?
या कार्यक्रमासाठी प्रवेश - सर्वांना मोफत आणि खुला आहे.

अशासारख्या अनेक प्रश्नांपैकी एका तरी प्रश्नाचे कुतुहल तुम्हाला असेल तर नक्की या. येथे विविध जाणकार आणि तज्ज्ञ तुमचे कुतुहल शमवायला हजर असतील.  तुम्ही स्वत: याच आपल्या बरोबर आपल्या मित्रमैत्रिणींनाही घेऊन या. आपल्या ओळखीच्यांना नातलगांना जरूर कळवा. आपल्या शाळेत, कॉलेजात, सोसायटीत, परिवारात सर्वांना कळवा. अधिक माहितीसाठी – संगीता 9850041700, 8446041770, माधुरी 9823244272, विनय र. र. 9422048967 यांच्याशी संपर्क साधा
==========================================================



मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, आयसर, पुणे आणि गरवारे कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
वैज्ञानिक गप्पा कार्यक्रम
शुक्रवार १४ एप्रिल २०१७, संध्याकाळी ६:१५ वा.

ठिकाण: दृकश्रवण सभागृह, गरवारे कॉलेज, कर्वे रोड, पुणे
वक्ते: डॉ चंद्रशील भागवत

व्याख्यानाचा विषय:

सारखाव्याचा शोध आणि विज्ञानाची वाढ

निसर्गाचा अभ्यास करत असताना कधी अचानकपणे त्या अभ्यासात काही सारखावा आढळतो. बिंब-प्रतिबिंबाप्रमाणे काही वस्तूंच्या, जीवांच्या रचनेतही काही गणिती सूत्रबद्धता दिसून येते. तिची उकल करताना सममिती संकल्पना, त्यामागचे गणित आणि विज्ञान उलगडत जाते आणि विविध विज्ञान-शाखा आणि गणित या विषयांमध्ये आपली जाण वाढलेली दिसते. हे कसे होते आणि झाले याबद्दल आपले अभ्यासातून आलेले अनुभव डॉ. चंद्रशील भागवत आपल्यासमोर उलगडून दाखवतील.

संक्षिप्त परिचय: डॉ चंद्रशील भागवत, मुळात सांगलीचे, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथून सांख्यिकी विज्ञानातील पदवी प्राप्त केल्यानंतर भारतीय सांख्यिकी संस्थेच्या, बंगलोर केंद्रातून पदव्युत्तर पदवी मिळवली आणि टाटा मूलभूत संशोधन संस्था टिआयएफआर, मुंबई, येथे पीएचडी केली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे अध्यापकांना देण्यात येणारा प्रेरणा - इन्स्पायर पुरस्कार त्यांनी मिळवला.. सध्या आयसर, पुणे येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यानी संख्या सिद्धांत आणि प्रतिनिधिता सिद्धांत या विषयी संशोधन केले आहे.

मोटारगाडीच्या विकासात प्रारूपे, तपासण्या महत्वपूर्ण

श्रीनिवास शारंगपाणी यांचे मतमराठी विज्ञान परिषद व इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सतर्फे व्याख्यान

पुणे : "कोणतीही मोटारगाडी बनविताना प्रथम त्याचे प्रारूप आणि विविध तपासण्यांवर भर दिला जातो. एखाद्या गाडीच्या अंतिम बनावटीसाठी जवळपास तीन वर्षांचा कालावधी लागतो. शंभराच्या आसपास प्रारूपे बनवून त्याच्या विविध तपासण्या केल्या जातात. कोट्यवधी रुपये खर्च होतात. या सगळ्यात उत्तीर्ण झाल्यानंतरची त्या प्रारूपाचे उत्पादन करण्यात रूपांतर होते," असे मत टाटा मोटर्सच्या संशोधन व विकास विभागाचे माजी सहायक सरव्यवस्थापक श्रीनिवास शारंगपाणी यांनी व्यक्त केले. 

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने 'मोटारगाडीचा विकास' (डेव्हलपमेंट ऑफ ऍटोमोबाइल्स) या विषयावर 
इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात श्रीनिवास शारंगपाणी बोलत होते. याप्रसंगी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. यशवंत घारपुरे, इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअर्सचे चेअरमन डॉ. गिरीश मुंदड़ा आदी उपस्थित होते.

श्रीनिवास शारंगपाणी म्हणाले, "ग्राहकांच्या मागण्या लक्षात घेऊन मोटारींमध्ये आधुनिकता आणली जाते. मालवाहू, प्रवाशी गाड्या बनविताना विविध प्रकारचे रस्ते, हवामान, अपघातप्रवण परिस्थितीमध्ये तपासण्या घेतल्या जातात. संकल्पना ते उत्पादन अशी ही प्रक्रिया असते. त्यात सातत्याने बदलही होत असतात. भारतातील ऍटोमोबाइल कंपन्या आता संशोधनावरही भर देत आहेत. त्यामुळे परदेशी बनावटीच्या वाहनांपेक्षा आपल्या स्वदेशी बनावटीची वाहने अधिक चांगली व सक्षम होत आहेत. ऍटोमोबाईलचा विकास झपाट्याने होत आहे." नॅनो गाडीची बांधणी आणि दर्जा अतिशय उत्कृष्ट असूनही, काही धोरणात्मक त्रुटींमुळे तिला चांगला प्रतिसाद मिळाला नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

प्रा. यशवंत घारपुरे म्हणाले, "गेल्या काही वर्षात ऍटोमोबाईल क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. येत्या काळात तर स्वयंचलित गाड्या येऊ घातल्या आहेत. त्यामुळे येणारी आव्हाने पेलण्यासाठी आपणही सज्ज झाले पाहिजे."

मोटारगाडीचा, दळणवळणाच्या साधनांचा आणि या क्षेत्राचा विकास कसा होत गेला, याबाबत शारंगपाणी यांनी सादरीकरण आणि चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. डॉ. गिरीश मुंदडा यांनी प्रास्ताविक केले. 


महान विज्ञानयोगी – आईनस्टाइन
(मानसिक जडणघडण, विचारप्रक्रिया अथवा संस्कार आणि वैज्ञानिक शोध यांचा परस्पर संबंध)

महान विज्ञानयोगी – आईनस्टाइन
(मानसिक जडणघडण, विचारप्रक्रिया अथवा संस्कार आणि वैज्ञानिक शोध यांचा परस्पर संबंध)

अल्बर्ट आईनस्टाइन हा एक विज्ञानयोगी होता. त्याच्या बालपणीच त्याच्यावर जे संस्कार झाले त्यांचा त्याच्या शोधकार्यावर परिणाम झाला. हा परिणाम कसा झाला आणि संस्कार - व्यक्तीने केलेले असतील अथवा परिस्थितीने झालेले असतील - ते संस्कार कोणते होते? गेल्या शंभर वर्षातल्या वैज्ञानिक सिद्धांतांमध्ये एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणून ‘सापेक्षतेचा सिद्धांत’ नक्कीच नोंदता येईल. तो एक व्यापक आणि सुंदर सिद्धांत आहे. आईनस्टाइनवर झालेल्या संस्कारांमुळेच तो उद्भवला असे या मांडणीत म्हणायचे आहे. डॉ. मुकुंद मोहरीर यांनी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाच्या दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ रोजी, एस एम जोशी सोशलिस्ट फौंडेशन, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात असे प्रतिपादन केले. आईनस्टाइनने तो मांडला नसता तर वैज्ञानिक समूहास तो सापडायला कदाचित आणखी एखादे शतक लागले असते असे मत डॉ. मोहरीर यांनी मांडले.

आईनस्टाइनचे बालपण –
आईनस्टाइन बालपणी बोलण्यात मंद होता. तीन वर्षांचा झाल्यावर तो बोलू लागला. परंतु तेही अडखळत आणि तोतरे तोतरे. त्याचा तोतरेपणा जाण्यास दहावे वर्ष उजाडावे लागले. याचे कारण त्याची विचार करण्याची पद्धत शाब्दिक नव्हती तर प्रतिकात्मक होती, म्हणजे तो शब्दांद्वारे विचार करत नसे तर डोळ्यांपुढे संकल्पना, घटना यांचे चित्र उभे विचार करत असे. वैचारिक प्रयोग – थॉट एक्सप्रिमेंटस - हे आईनस्टाइनच्या कार्याचे वैशिष्ठ्य मानले जाते, ते मोठेपणी प्रकट झाले, त्याचे बालपणी दिसलेले रूप म्हणजे शब्दांवाटे बोलता न येणे. या गुणाचा परिपाक म्हणून आईनस्टाइनवर लहानपणापासूनच शब्दांच्या पलिकडचे शोधायचा संस्कार झाला. आईनस्टाइनचे घरात अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य होते. दिली
आईनस्टाइनच्या वडिलांनी त्याला वयाच्या पाचव्या वर्षी एक लहानसे खिशात मावेल एवढे होकायंत्र खेळणे म्हणून आणून दिले. लहानगा आईनस्टाइन त्याच्याशी सतत खेळत असे. कसेही हलविले, फिरविले, थरथरवले, गिरक्या घेतले तरी होकायंत्राची सूची एका ठराविक दिशेतच राहाते याने तो अचंबित होई. आपल्याला जे विश्व दिसते त्याच्यामागे काहीतरी खोलवर दडलेले, लपलेले गूढ असले पाहिजे – अशा विचारांचा पडलेला ठसा हा आईनस्टाइनवर झालेल्या संस्कारांपैकी पहिला संस्कार.
निसर्गाबद्दल त्याला खूप कुतुहल वाटत असे. त्याचे ते कुतुहल जागे राहील- तो प्रयोगशिल राहील यासाठी त्याचे आईवडील जाणिवपूर्वक प्रयत्न करीत – हा त्याच्यावर झालेला दुसरा संस्कार.
तिसरा संस्कार केला तो मॅक्स टॉलेमी या वैद्यकीय व्यावसायाचे शिक्षण घेणाऱ्या तरूणाने. हा तरूण आईनस्टाइनच्या घरी आठवड्यातून एकदा जेवावयास येत असे. आईनस्टाइन ९-१० वर्षांचा असतानाच मॅक्स हा त्याचा चांगला मित्र बनला, तो त्याचा अभ्यासही करून घेत असे. मॅक्सने आईनस्टाइनला विज्ञान विषयांतली अनेक पुस्तके दिली – त्यातले पहिले पुस्तक होते ‘मुलांसाठी विज्ञान’. बाल आईनस्टाइनच्या अनेक प्रश्नांना मॅक्स उत्तरे देत असे. विज्ञानच्या पुस्तकामुळेच ‘प्रकाशाचे स्वरुप’ या विषयी आईनस्टाइनच्या मनात अनेक विचार घोळायला लागले. पुढे हीच प्रेरणा “मी प्रकाशाच्या लाटेवर स्वार झालो तर?” या रुपाने प्रगटली.
आईनस्टाइनचा काका हा अजून एक प्रेरणास्रोत होता. १२ वर्षांच्या आईनस्टाइनला त्याच्या काकाने बीजगणिताचे पुस्तक आणून दिले होते. भूमितीचे पुस्तक आईवडिलांनी दिलेलेच होते. मॅक्सही गणिताची पुस्तके पुरवत असेच. याचा परिणाम म्हणजे मुळातच अमूर्त विचार करणाऱ्या आईनस्टाइनची गती गणित विषयात वेग घेवू लागली. गणितातली प्रमेये वेगळ्या पद्धतीने सोडवणे त्याच्या अंगवळणी पडू लागले. आईनस्टाइनने पायथागोरसच्या सिद्धांताचीही त्याची स्वत:ची वेगळी सिद्धता मांडली. १५ वर्षाच्या होईपर्यंत आईनस्टाइन डिफरन्शियल आणि इंटिग्रल कॅलक्युलस मधील तज्ज्ञ बनला.
मॅक्सच्या मदतीने वयाच्या १३-१४व्या वर्षीच आईनस्टाइनने मॅक्सवेलच्या विद्युतचुंबकीय सिद्धांताचे आणि समीकरणांचे सार समजावून घेतले होते.
एकूणच वयाच्या १३व्या वर्षीच अल्बर्ट आईनस्टाइनचे भौतिक पदार्थविज्ञान विषयातील ज्ञान एखाद्या विद्यापीठातील पदवीधराच्या ज्ञानाच्या तोडीचे झाले होत.
५व्या वर्षी मिळालेल्या होकायंत्राच्या खेळण्याच्या अनुभवांना, मॅक्सवेलच्या विद्युतचुंबकीय क्षेत्रांच्या गुणधर्मांच्या अभ्यासाची जोड यांचा एक विशेष ठसा आईनस्टाइनच्या मनात उमटवला गेला. तो त्याच्या पहिल्या संशोधन निबंधाचा विषय होता – चुंबकीय क्षेत्राचा इथर या माध्यमावर होणारा परिणाम”. याच संस्कारांतून पुढे  - प्रकाश किरण आणि लहर या दोन्ही रूपात असतो असा द्वैती सिद्धांत आईनस्टाइनने मांडला...... 

मॅक्सने आता आईनस्टाइनला तत्वज्ञानविषयक पुस्तके पुरविण्यास सुरूवीत केली. वयाच्या १३व्या वर्षीच आईनस्टाइनला काण्टच्या तत्वज्ञानाचा परिचय झाला. विश्व एकात्मिक आहे, विश्व नियमबद्ध आहे, ईश्वराचे नियम सर्वांना समान आहेत, वरवर पाहता असंबद्ध आणि गोंधळाच्या वाटणाऱ्या घटनांमध्येही एक खोलवर लपलेली सुसंबद्धता आणि सुसंगती असलीच पाहिजे – तत्वज्ञान (धर्म खरं तर अध्यात्म) आणि विज्ञान यांचा अंगिकार एकाचवेळी करता येतो, विश्व नियमबद्ध असल्याने कार्यकारणभाव आणि वस्तुनिष्ठ विचारसरणी यांचे सहाय्याने विश्वाचे नियम समजणे शक्य आहे, ईश्वराची म्हणजे परमसत्याची अनुभूती येऊ शकते. प्रत्यक्ष अनुभवाने सत्य समजते. आदी विचार संस्कारक्षम अल्बर्टच्या मनावर खोलवर रुजवण्याचे अप्रत्यक्ष श्रेय मॅक्सला द्यायला हवे.

विश्वाचे नियम किंवा ईश्वराचे मनोगत समजणे शक्य आहे आणि विश्वात सुसंगती – सर्वांसाठी एकच नियम असला पाहिजे हा विचार पुढे आईनस्टाइनच्या आयुष्यात संशोधनाच्या दृष्टिने मार्गदर्शक ठरला. तरूण आईनस्टाइन विचार करू लागला की, चंद्र पृथ्वीभोवती एका गतीने फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती वेगळ्या गतीने फिरते, सूर्य आपल्या आकाशगंगेत फिरतो, आकाशगंगाही फिरतात या सर्व गोष्टींची नोंद ईश्वर कशी ठेवत असेल? त्याचेकडे या सर्व सापेक्ष गती मोजण्यासाठी एखादा निरपेक्ष, स्वतंत्र, सर्वत्र समान असलेला, मापदंड असलाच पाहिजे. ते कसा असेल? प्रकाशाची गती निरपेक्षपणे सर्वत्र समान स्वतंत्र आहे या त्याच्या शोधामागे हे कान्टच्या तत्वज्ञानाचे संस्कारच होते.

लहानपणापासून आईनस्टाइनकडे चित्त एकाग्र करणे, अंतर्मुखता, चिकाटी, जिज्ञासा, दृढविश्वास, आत्मविश्वास, सहनशिलता हे गुण होतेच, पण शिवाय शब्दाने विचार करण्याऐवजी प्रतिमांच्या सहाय्याने विचार करण्याची निसर्गदत्त देणगी होती. त्यातच वरील संस्कारांची भर पडली. भरीस भर म्हणजे वयाच्या १५/१६व्या वर्षीच त्याची माख या तत्वज्ञान्याशी ओळख झाली. माख हा वैज्ञानिकापेक्षा अधिक तत्वज्ञच होता. सापेक्षता म्हणजे काय हे माखने तत्वज्ञानाच्या अंगातून जाणले होते. माखने लिहीले आहे की-
रात्री सर्वजण झोपलेले असताना सर्व वस्तू १००० पटीने वाढल्या – अगदी मोजमाप करावयाच्या पट्टीसह सर्व वस्तू – तर नेमका बदल काय झाला हे कोणालाच समजणार नाही. म्हणजे – लहान आणि मोठे – हे सापेक्ष – मोजपट्टीच्या सापेक्ष – आहे. आईनस्टाइनने पुढे शोधलेल्या सापेक्षतेच्या सिद्धांताच्या तत्वाचे मूळ माखच्या वरील प्रकारे प्रतिपादन करण्याच्या संस्कारामध्ये आहे.

१५-१६ वर्षाचा असल्यापासूनच आईनस्टाइन संकल्पनांवर विचार करू लागला. त्यातला एक विचार त्याच्या मनात घर करून राहिला तो म्हणजे – जर प्रकाशलहरींवरच स्वार होऊन प्रकाशाचा पाठलाग केला तर? तर त्यावेळी सर्व पदार्थांची गती काय दिसेल? मनात शिजत राहिलेला हा विचार परिपक्व होण्यास पुढील दहा वर्षांचा काळ लागला ....
                     
१९०२ साली वयाच्या २३व्या वर्षी अल्बर्ट आईनस्टाइनची नेमणूक बर्न येथील पेटंट कार्यालयात झाली.  कार्यालयात जाण्यासाठी बसमधून प्रवास करावा लागत असे. वाटेत रोज एका टॉवरवरील घड्याळ त्याचे लक्ष वेधून घेई. गतीने जातांना कालमापनावर काय परिणाम होत असावा हा विचार त्याचे मनात घोळू लागला. बसचा प्रवास व घड्याळ  यांनी कळत केलेले संस्कार पुढे सापेक्षता सिद्धांत शोधण्याच्या वेळी उपयोगी ठरले.
लवकर अल्बर्टने ऊष्ण पदार्थांच्या प्राणांव विचार करण्यास प्रारंभ केला.  मॅक्स प्लां या जर्मन शास्त्रज्ञाने याबातचे नियम शोधून काढले होते.  विचार करता करता अल्बर्टच्या मनाअचानक लहर उमटली की, कृष्णपदार्थांच्या प्रारलहरींचे सूत्र सर्वच विद्युतचुंबकीय प्रारणाला लावले तर? मग इतकी वर्षे मनात घर करून राहिलेल्या चुंबकीय क्षेत्र, प्रकाश किरण, गती यांच्या कल्पनांमधील सुसंगतीची जाणीव अल्बर्टला झाली. प्रकाशकिरण व ऊर्जा यांचा स्वरूपाचा सिद्धांत त्याला प्लँकचे सूत्रात दिसला. प्रकाशकिरण हे लहररूप व कणरूप असे दोन्ही स्वरूपात असावेत व प्लँकचे उष्मागतिकीशी त्याची सांगड घालणारे सूत्र अल्बर्टने प्रकाशकिरणांसाठी वापरले. ऊष्णता व विद्युतचुंबकीय प्रारण यांचे एकीकरण यामुळे केले गेले. (निसर्गा सुसंवाद असला पाहिजे या कांटच्या संस्कारांचा उपयोग येथे झाला.)

प्रकाशकिरणांच्या स्वरूपाच्या या अंगाचे ज्ञान झाल्याने, प्रकाशाचे स्वरूप काय? या अनेक वर्षे डोक्यात असणाऱ्या कल्पनेने अल्बर्टला झपाटले. 
(येथे थोडेसे विषयांतर उचित आहे. ते म्हणजे तत्कालीन जर्मन समाजातील विज्ञानाचे व तत्वज्ञानाचे स्थान. जर्मन शास्त्रज्ञ व वैज्ञानिक विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये अग्रेसर होते. तर विज्ञान व धर्म एकत्र नांदू शकतात असे सांगणारा कांट हा तत्वज्ञ जर्मनीवर प्रभाव पाडून होता. विज्ञानविषयक विपूल साहित्य जर्मन भाषेत प्रसिद्ध होत होते. तेथील गृहिणी व विद्यार्थी यांना सुद्धा हे साहित्य उपलब्ध होत होते व विज्ञानाचा प्रसार समाजात खोलवर झाला होता. या पासून स्फूर्ती घेऊनच श्री. गो. रा. परांजपे यांनी महाराष्ट्रामध्ये विज्ञानाचा प्रसार होण्यासाठी नव्वद वर्षांपूर्वी "सृष्टिज्ञान" नावाचे विज्ञान प्रसाराला वाहिलेले मासिक सुरू केले. आजवर अखंडपणे प्रसिद्ध होणाऱ्या या मासिकाला लोकाश्रयाची गरज आहे. जर्मनीत विज्ञान घरोघरी पोहोचलेले होते. तसे अजूनही आपल्या येथे झालेले नाही ही खंत मनात आहे.)

प्रकाशाची गती निरपेक्ष व अंतिम मर्यादेची आहे – ही गती कोणालाही ओलांडणे शक्य नाही  कोणताही वस्तुमान असलेला पदार्थ प्रकाशचे गतीने जाऊ शकणार नाही. पदार्थांना गतिमान करीत राहीले तर त्याचा परिणाम वस्तुमानाचे वाढीत होत असावा,  म्हणजेच वस्तुमान व ऊर्जा एकमेकात रुपांतर करता येणार्‍या असल्या पाहिजेत आदि निष्कर्षांप्रत अल्बर्ट पोहोचला. तसेच प्रकाशकिरणांसाठी माध्यमांची जरूरी नाही. तो स्वत:च वाहक कण - वर्चुअल पार्टिकल - निर्माण करतो, उर्जेची लहर पुढे सरकल्यावर वाहक कण नष्ट होतात. आदी निष्कर्ष काढून अल्बर्टने ‘ईथर’ला हद्दपार केले.

येथे परत पूर्वसंस्कारांचे अस्तित्व जाणवते. वयाच्या पाचव्या वर्षी हातात पडलेले होकायंत्र कोणत्याही दिशेत फिरविले तरीही सूचीवर त्याचा परिणाम होत नाही. चुंबकीयक्षेत्र व प्रकाश यांचा परस्परसंबंध आहे हे सूत्र व प्रकाशाची गती सर्व दिशांना समान राहील, हे पूर्वसंस्कारांचे महत्व अधोरेखित करतात. प्रकाशकिरण म्हणजे विद्युतचुंबकीय क्षेत्रामध्ये ऊर्जा वाहून नेणारे साधन हा साक्षात्कार अथवा अनुभव अल्बर्टला आला.
ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव हे कान्टचे मत – हा संस्कार देखील दिसतो.

समकालीन थोर जर्मन वैज्ञानिक लॉरेन्टझ आणि पॉईनपोकर यांनाही विविक्षित सापेक्षतेचा सिद्धांत गवसलेला होता. तत्कालीन जर्मन समाजात विखुरून असलेले विज्ञान पहाता लॉरेन्टझ आणि पॉईनपोकर यांचे कार्याची माहिती आईनस्टाइनला असावी, तरीही विविक्षित सापेक्षतेचा सिद्धान्त आईनस्टाइनच्या एकट्याच्याच नावावर का नोंदला जातो – या वादग्रस्त शंकेकडे दुर्लक्ष करून एवढेच म्हणता येईल की, आत्मविश्वास, विचारांची स्पष्टता आणि प्रस्थापित धार्मिक विचारांवरील विरोध स्पष्टपणे नोंदवण्याचे बालपणाचे संस्कार परत एकदा अल्बर्टच्या बाजूने उभे राहिले. वयाच्या ५व्या वर्षापासून पुढे तीन वर्षे अल्बर्ट कॅथॉलिक चर्चच्या शाळेत शिकत होता. तेव्हाच प्रस्थापित धार्मिक रुढींबाबतची त्याची बंडखोरी दिसून आली होती. लॉरेन्टझ आणि पॉईनपोकर बंडखोर नव्हते, न्यूटनच्या सिद्धांतांना ठोसपणे नाकारणे लॉरेन्टझ आणि पॉईनपोकर यांना शक्य झाले नसावे ते आईनस्टाइनला शक्य झाले.

विविक्षित सापेक्षतेचा सिद्धान्त सापडल्यावर अल्बर्टने सरळ सरळ न्यूटनच्या गृहीतकांनाच आव्हान दिले.
- स्थळकाळाचे मोजमाप सर्वांसाठी समान असले पाहिजे
- अवकाश व काळ (स्पेस अँड टाईम) ही दोन्हीही स्वतंत्र, परिपूर्ण आणि स्वयंसिद्ध तत्वे आहेत
या न्यूटनने मानलेल्या गृहितकांमध्ये बदल आवश्यक असून, अवकाश आणि काळ ही दोन स्वतंत्र तत्वे – निरंकुश आणि स्वयंसिद्ध नसून त्यांना जोडणारा प्रकाश किंवा प्रकाशलहरी हे एकमेव निरंकुश आणि स्वयंसिद्ध तत्व आहे हे अल्बर्टने ठामपणे मांडले.
अवकाश व काळाचे मोजमाप निरीक्षकाच्या स्थती-गतीनुसार वेगवेगळे होऊ शकते परंतु प्रकाशाची गती कोणाही स्थिती-गतीतील निरीक्षकांना सारखीच असेल हे तत्व आईनस्टाइनने वैश्विक सत्य म्हणून मांडले.
हा सिद्धांत काही काळ दुर्लक्षितच राहिला. सहा महिन्यांनंतर मॅक्स प्लँक या जर्मन दिग्गज वैज्ञानिकाने काहीशा नाखुशीनेच त्याला मान्यता दिली. काही शंका उपस्थित केल्या, पण आईनस्टाइन आपल्या मतांवर ठाम होता. प्लँककडे दुर्लक्ष करून त्याने आपला मोहरा सापेक्षतेच्या व्यापकतेकडे वळवला.

१९०७ नंतर म्हणजे वयाच्या २८व्या वर्षी अल्बर्टने विविक्षित सापेक्षतेच्या सिद्धांताच्या मर्यादा घालवण्याच्या विचाराने – गुरुत्वाकर्षण आणि त्याच्यामुळे निर्माण होणारा प्रवेग यांची सांगड विविक्षित सापेक्षतेशी घालण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याने गॅलिलिओचा सिद्धांत तपासण्यास सुरूवात केली. गॅलिलिओच्या प्रसिद्ध प्रयोगानुसार एक जड पदार्थ आणि एक हलका पदार्थ एकाच उंचीवरून खाली सोडले तर दोन्ही पदार्थ एकाच वेळेला जमिनीवर पोचतात. म्हणजेच मुक्तपणे खाली पडणाऱ्या पदार्थाचे गुरुत्वीय प्रवेग पदार्थाच्या वस्तुमानाच्या निरपेक्ष आहे, तो वस्तुमानावर अवलंबून नाही. बल म्हणजे वस्तुमान आणि प्रवेग यांचा एकत्रित परिणाम, (बल = वस्तुमान X प्रवेग) आणि वस्तुमान निष्प्रभावी असेल तर ते शून्य धरायला हवे, म्हणून पडणाऱ्या वस्तूवरचे बल शून्य मानावे लागेल. मग वस्तू वर जात असतानाही बल शून्यच असले पाहीजे.

यासाठी आईनस्टाइनने एक काल्पनिक प्रयोग केला.
प्रयोग १ - समजा एका उंच फलाटावर एक माणूस हातात एक जड लोखंडी गोळा घेऊन उभा आहे. त्या वेळी त्याच्या हातावर गोळ्याचा भार जाणवेल. या माणसाने गोळ्यासकट खाली उडी मारली तर – त्याला गोळ्याचा भार जाणवणार नाही, कारण तो आणि गोळा समान प्रवेगाने जमिनीकडे जात असतील.
प्रयोग २ – समजा एक बंद पिंजरा खूप लांब अंतराळात आहे, त्याठिकाणी कोणतेच गुरुत्वीय बल कार्य करत नाही. आता बाह्य बस लावून तो पिंजरा वरच्या दिशेला असा खेचला की त्याच्या वेग दर सेकंदाला ९.८१मी प्रती सेकंद या प्रमाणात वाढत ठेवला तर त्यावेळी पिंजऱ्यातल्या काट्यावर त्या माणसाचे वजन काट्यावर ६० किलो दाखवले जाईल. याचा अर्थ प्रवेगजन्य आणि गतीस रोध करणारे वस्तुमान हे एकच आहेत. असा महत्त्वाचा निष्कर्ष आईनस्टाइनने काढला......

निसर्गदत्त देणगीस संस्कारांची साथ मिळाली तर काय होऊ शकते याचे अल्बर्ट आईनस्टाइन हे एक उत्तम उदाहरण आहे.  

·         डॉ. मु. म. मोहरीर यांच्या दिनांक १७.२.२०१७ रोजी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाचे वतीने एस. एम. जोशी सोशलिस्ट फौंडेशनच्या चर्चा सभागृहात झालेल्या भाषणाचा एक सारांश
·         संकलन – रमेश दाते, 8806586151, 02024530589      * संपादन – विनय र. र.

      rameshdate@gmail.com                                                     vinay.ramaraghunath@gmail.com
 ......  (पुढील भाग येत आहे..)


वैज्ञानिक गप्पा
********* 
विज्ञानातील अंधश्रद्धा 
*********
वक्ते - डॉ. मिलिंद वाटवे
आयसर, पुणे
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, आयलर, पुणे आणि गरवारे महाविद्यालयाचा संयुक्त कार्यक्रम
10 मार्च 2017, संध्याकाळी 6.15 वाजता
गरवारे महाविद्यालय, एव्ही हॉल, कर्वे रोड, पुणे 4



SCIENCE GAPPA PROGRAMME
Jointly organised by Marathi Vidnyan Parishad, Pune, IISER, Pune Garware College.
1)  Date & Time                 : Friday the 10th March 2017 at 6:15 pm
2)  Place                            : AV Hall Garware College, Karve Road, Pune
3)  Speaker                        : Dr. MILIND GAJANAN WATVE
4)  Subject                         : Vidnyanatil Andhshraddha

दि इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंजिनीअर्स 
आणि 
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांच्यातर्फे
ब्रेस लिपीतील वि
दृष्टीहिनांसाठी अक्षरवाटा


वक्ते-डॉ. जयंत चिपळूणकर 
२१ फेब्रुवारी २०१७, संध्या. ६:१५
स्थळ - दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स,
शिवाजीनगर, पुणे ५


वैज्ञानिक गप्पा

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि विज्ञान संशोधन शिक्षण संस्था - आयसर, पुणे - यांच्या संयुक्त विद्यमाने आयसर, पुणे मधील वैज्ञानिकांशी विज्ञान विषयक विविध बाबींवर गप्पा मारण्याचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी संध्याकाळी दोन तास हे कार्यक्रम असतात. आयसरने वैज्ञानिकांची व्यवस्था करायची आणि मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाने अशा गप्पा ऐकायला – मारायला उत्सुक असणाऱ्या श्रोत्यांना त्यासाठी एकत्र आणायचे अशी परस्परपूरक कामे दोन्ही संस्थांनी वाटून घेतली. कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे दृक-श्राव्य सभागृह ही जागा नक्की केली गेली. महाविद्यालयानेही आपणहून या उपक्रमात सहआयोजकाची भूमिका घेण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्याला बाकी सर्वांनी आनंदाने मान्यता दिली.

कार्यक्रम १ - डॉ. अरविंद नातू –
आपण निसर्गापासून काय शिकलो?

या उपक्रमातला पहिला कार्यक्रम १३ जानेवारी २०१७ रोजी झाला. या वेळी या दोन्ही संस्थांशी सतत संपर्कात असणारे आयसरचे एक संस्थापक रसायनशास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी “आपण निसर्गापासून काय शिकलो?” या विषयाबद्दल आपली अभ्यासपूर्ण रोचक माहिती सर्वांपुढे मांडली. यातून कित्येकांचे कुतूहल शमले आणि कित्येकांचे कुतूहल आणखी वाढले. अशा कुतूहल वाढलेल्या तरूणांमधून पुढचे संशोधक तयार व्हावेत हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाचे वतीने दर वर्षी – माझ्या शहरातील विज्ञान – या नावाने एक आठवड्याभराचे फिरते शिबीर घेण्यात येते. त्यात ९वीत शालेय पातळीवरील शिकणाऱ्या मुलामुलींना सहभागी करून घेतले जाते. पुणे शहर व आसपासच्या परिसरातील विज्ञान-तंत्रज्ञान विषयक कार्य तसेच संशोधन करणाऱ्या संस्थांमधील वैज्ञानिकांचे काम प्रत्यक्ष पहाण्याची संधी या कार्यक्रमातून त्यांना मिळते. पुढील आयुष्यात संशोधन करण्याची प्रेरणा ‘माझ्या शहरातील विज्ञान’ कार्यक्रमात सहभागी असणाऱ्यांना मिळते असा अनुभव आहे. या उपक्रमात सामील झालेले अनेक विद्यार्थी आज संशोधन क्षेत्रात आहेत. आयसरने नेहमीच मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाच्या ‘माझ्या शहरातील विज्ञान’ या उपक्रमातील विद्यार्थ्यांना मोठ्या उत्साहाने आपल्या संस्थेची दारे खुली ठेवली, त्यामुळे या उपक्रमात सहभागी झालेले आणि संशोधनक्षेत्रात आपली कारकीर्द करणारे अनेक विद्यार्थी आयसरमधील संशोधनात सहभागी झालेले आहेत. कुतूहल जागे करणे आणि ते जागे झाल्यावर ते शमविण्यासाठी आपली दारे खुली ठेवणे या कामी आयसर खूपच पुढे आहे – हे अभिमानाने सांगावेसे वाटते.

मराठीतून “वैज्ञानिक गप्पा” मारण्यासाठी वैज्ञानिकांना ‘तयार’ करणे हे फार सोपे काम नाही. वैज्ञानिक आपल्या सर्व संशोधनाची मांडणी, संदर्भ गोळा करणे; तसेच आपल्या संशोधनांची माहिती - संस्था, राज्य, राष्ट्र, आंतर-राष्ट्रीय पातळीवर परिसंवादांमधून - करताना बहुतेक वेळा इंग्रजी भाषेचा वापर करतात. त्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेत आपली मांडणी करणे सरावाचे असते. पण जेव्हा ही माहिती वैज्ञानिक नसलेल्या पण उत्सुक जनतेला जनतेच्या भाषेत सांगायची असते आणि तीही समजेल अशा शब्दात - सोपी करून – तेव्हा वैज्ञानिकांनाही ते काहीसे आव्हानात्मक वाटत असणार. हे जड काम करण्यासाठी वैज्ञानिकांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी आयसरमधील डॉ. अपूर्वा बर्वे यांनी घेतली आहे.



आता वैज्ञानिक गप्पा कार्यक्रम २ – होत आहे.
दुसरा शुक्रवार – १० फेब्रुवारी २०१७, संध्या. ६:१५ वाजता
स्थळ दृक-श्रवण सभागृह (एव्ही हॉल),
आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रस्ता, पुणे ४
विषय - मोबाईलमागे दडलंय काय?
वक्ते - डॉ. भास बापट

आज सरसकटपणे मोबाईल फोन वापरात आला आहे. किंबहुना आपला मोबाईल ही आपली ओळख ठरत आहे. या मोबाईलचे तंत्र प्रत्यक्षात आपल्या वापरात येण्याआधी कोणकोणत्या मार्गाने कोणकोणत्या दिव्यांमधून पार पडले ते जाणून घ्यायला जे जे उत्सुक आहेत त्या सर्वांना या कार्यक्रमाचे निमंत्रण.....

डॉ. भास बापट हे मुळात पदार्थ वैज्ञानिक आहेत.

·         अणू, रेणू, आयन यांच्यात होणारे टकराव आणि त्यातून होणारे रेण्वीय विभाजन, त्याचे परिणाम हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. इस्रोच्या ‘आदित्य एल-१’ या उपक्रमाअंतर्गत - अंतराळात कार्यरत असेल असा आयन वर्णमापक - बनविण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.

·         महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच वास्तुरचनाकारांसाठी प्रयोगातून आधुनिक पदार्थविज्ञान समजून घेण्यासाठीचे अभ्यासक्रम त्यांनी तयार केले आहेत.

·         शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षणात गोडी लागावी म्हणून काम करणाऱ्या “एकलव्य” या संस्थेसाठी त्यांनी पुस्तके लिहून दिली.

·         समाज विज्ञान केद्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना मार्गदर्शन केले ज्यातून पदार्थविज्ञानात काम करण्याची गोडी विद्यार्थ्यांना लागावी.

·         त्यांनी आपली कारकीर्द अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी मधून सुरू केली. ते सध्या आयसर, पुणे येथे कार्यरत आहेत.



मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि आयसर आयोजित - 
सायन्स गप्पा भाग २
दुसरा शुक्रवार व्याख्यान - 10 फेब्रु. संध्या 6:15 वा.
स्मार्टफोनच्या मागे दडलंय काय?
वक्ते: डॉ. भास बापट
स्थळः दृकश्राव्य सभागृह, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे 4

या व्याख्यानात गेल्या शतकात झालेला भौतिक शास्त्रातील प्रगतीचा आढावा घेत-
एकंदरीत दूरसंचार आणि संपर्क माध्यमांच्या झालेल्या विकासाबद्दल वक्ते चर्चा करतील.
विद्युत्-चुंबकीय क्षेत्राची संकल्पना, त्या संकल्पनेचा पाठपुरावा आणि प्रयोगांती विद्युत चुंबकीय क्षेत्राचा पुरावा आपल्याला कसा मिळत गेला याचा इतिहास वक्ते सांगतील.
पदार्थांमध्ये आणि त्यांच्या गुणधर्मांमध्ये हवा तसा बदल सूक्ष्म पातळीवर करून घेण्यात शास्त्रज्ञांना कसे यश आले याबद्दलही आपणाला माहिती मिळेल.
या अभ्यासाचा उपयोग तऱ्हेतऱ्हेच्या विद्युत उपकरणांच्या निर्मितीसाठी कसा कारणीभूत ठरला आणि
अशा विकासातून फोन, रेडिओ, संगणक यंत्रे आणि स्मार्टफोन्स पर्यंन्तची वाटचाल कशी झाली –
याची मनोरंजक माहिती या व्याख्यानात मिळेल


दि इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंजिनीअर्स आणि मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांच्यातर्फे
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पावर खुले चर्चासत्र
प्रमुख उपस्थिती
कोकण रेल्वेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले, 
हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ, 
भारतीय रेल्वे अधिकारी प्रशिक्षण संस्थेतील अतिथी व्याख्याता दिलीप भट, 
नगर रचना तज्ज्ञ अनघा परांजपे पुरोहित 
वार :  शुक्रवार
दिनांक :  ३ फेब्रुवारी २०१७ वेळ :  सायं ६.०० वाजता
स्थळ : फिरोदिया सभागृह, दि इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंजिनीअर्स, शिवाजीनगर, पुणे.



v  शुक्रवार, 30 डिसें. 2016
आपटे बंधू व्याख्यान माला पुष्प ३३वे
प्लास्टिकावर बोलू काही
प्रा. नीता शाह
एस. एम जोशी सेमिनार हॉल पुणे

v  मंगळवार, 20 डिसें. 2016
यंत्र मानव आणि त्यामागील विज्ञान
सप्रयोग व्याख्यान
डॉ. शांतीपाल ओहोळ COEP
इन्स्टि ऑफ इंजिनीअर्स शि. नगर पुणे

v  शनिवार, 3 डिसें. 2016
विश्वाचे अंतरंग
संतोष टाकळे BARC
पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क, चिंचवड पुणे.

*      शुक्रवार, 18 नोव्हें.2016
मानवी देहातील सूक्ष्मजीव समूह : आपला अज्ञात अवयव
डॉ. अपूर्वा बर्वे (आयसर, पुणे)
एस. एम जोशी सेमिनार हॉल पुणे

*      शुक्रवार, 21 ऑक्टो.2016
सिमेंट - एक तापमान वाढविणारा घटक
मेजर मुकुंद आपटे
टिळक स्मारक मंदिर,पुणे


*      मंगळवार, 18 ऑक्टो.2016                                                                                                        
आताच नवीन लागलेले शोध
विनय र
इन्स्टि ऑफ इंजिनीअर्स शि. नगर पुणे
                                                                                                                                                                                                                                
*       बुधवार, 12 ऑक्टो.2016              
आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक सप्ताह -
भारतातील भूवैज्ञानिक वारसा स्थळे
अमृता परांजपे , डॉ. मकरंद बोडस , डॉ. हिमांशू कुलकर्णी आणि डॉ.विद्याधर बोरकर
एस. एम जोशी सेमिनार हॉल पुणे
                                                                                                                                                                                                                                
विज्ञानाच्या क्षेत्रात जून ते सप्टेंबर २०१६ 
या काळात लागलेले शोध.
काही छोटे काही मोठे
पण एकेक जबरदस्त महत्व असलेले.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 
                            *जाहीर व्याख्यान *                 

 मंगळवार दि.१८ अॉक्टोबर २०१६

रोजी सायं  ६.१५ वाजता

विषय - आताच नविन लागलेले शोध

वक्ते - विनय र र                         

ठिकाण - फिरोदिया सभागृह , दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स,

            स गो बर्वे चौक, १३३२ शिवाजी नगर पुणे - ४११००५.
 येथे झाले
सविस्तर वृत्तांत  लवकरच पहा. 
http://forefrontofscience.blogspot.com/2014/08/western-ghat-diversity-nanju-and.html
























मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
विशेष व्याख्यान

शुक्रवार 23 सप्टें 2016
सायं 6:15 ते 7:45


आपल्या रोजच्या वापरातील अनेक पदार्थ आपण त्यातले अन्नघटक पूर्णपणे उपयोगी पडतील असे वापरतो का?
अंडी वापरताना ती नेमकी किती उकडली की त्यातली पोषक द्रव्ये टिकून राहतात.
मधातील कोणती रसायने औषधी असतात? त्यांचे औषधी गुणधर्म टिकावेत, राखावेत म्हणून काय करायला हवे?
अनेक मलमांमध्ये मिरचीतील झोंबणारे रसायन घालतात, त्याच्यामुळे काय होते?
अनेक पदार्थ "गुणवान" आहेत पण ------
त्यांच्यातले ते गुण कसे राखायचे, टिकवायचे आणि वाढवायचे याचे भान देणारे व्याख्यान -

विषय - अंडी-मध-मिरचीचा नेमका वापर कसा करावा?

वक्ते- डाॅ. राजश्री कशाळकर

स्थळ- टिळक स्मारक मंदिर चर्चा सभागृह


सर्वांना निमंत्रण

गुरुत्वीयलहरींमुळे खगोलशास्त्राला नवी दिशा मिळेल 
डॉ. संजीव धुरंधर यांचे प्रतिपादन; 
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाच्या वतीने व्याख्यान
 29 मे 2016, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
 “शंभर वर्षांच्या संशोधनानंतर गुरुत्वीय लहरी शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. अवकाशातील विविध घटकांचा अभ्याबस करण्यासाठी गुरुत्त्वीय लहरी उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे येत्या काळात खगोलशास्त्रातील अनेक नवीन दालने उघडण्यात गुरुत्त्वीय लहरी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. एवढेच नाही, तर गुरुत्त्वीय लहरींच्या या संशोधनामुळे खगोलशास्त्राला नवी दिशा मिळणार आहे,” असे प्रतिपादन आंतरविद्यापीठिय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रातील (आयुका) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजीव धुरंधर यांनी केले.
मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘आईन्स्टाईन सेंटेन्नियल गिफ्ट : ग्रॅव्हिटेशनल वेव्हज डिस्कव्हर्ड’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. संजीव धुरंधर बोलत होते. 
याप्रसंगी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
अध्यक्षस्थानी परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे होते. 
माजी कार्याध्यक्ष विनय र. र., कार्यवाह नीता शहा उपस्थित होत्या.

डॉ. संजीव धुरंधर म्हणाले, “1916 मध्ये गुरुत्त्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. परंतु, पुढची शंभर वर्षे त्याच्या संशोधनासाठी लागली. त्याचे कारण म्हणजे गुरुत्त्वाकर्षणाचे बल कमी आहे. कालांतराने संशोधनाच्या पद्धती बदलत गेल्या. 60-70 दशकात जॉय वेबरने यामध्ये काही नवीन गोष्टी मांडल्या. आयुकाने 1989 पासून या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सप्टेंबर 2015 मध्ये या संशोधनाच्या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलो आणि गुरुत्त्वलहरींचा आपल्याला शोध लागला. हे संशोधन खर्‍या तीन वेगळ्या गोष्टींचे आहे. त्यामध्ये गुरुत्त्वलहरी, कृष्णविवर आणि कृष्णविवरांची रचना (ब्लॅकहोल बायनरी सिस्टिम) याचा समावेश आहे. कृष्णविवरांसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासही या संशोधनाचा उपयोग होणार आहे.”

“युरोप, इटली, अमेरिका, जर्मनी या देशांत यासंबंधीचे डिटेक्टर्स आहेत. आता भारतातही लायगो इंडिया नावाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत असून, त्यास पंतप्रधानांनी तत्त्वत मान्यता दिली आहे. येत्या काळात तो राबविला जाईल. त्यामुळे लेझर तंत्रज्ञान, किरणांच्या उपक्रमांत तसेच जीपीआरएससारख्या तंत्रज्ञानात याची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्याचबरोबर उच्च प्रतीच्या गणनप्रक्रियांमध्ये तो उपयुक्त ठरणार आहे. गुरुत्त्वीय लहरींच्या संशोधनामुळे अवकाशाचे नव्या दृष्टिकोनातून आकलन करणे शक्य होणार आहे,” असेही डॉ. धुरंधर यांनी नमूद केले.

डॉ. जयंत नारळीकर म्हणाले, “जवळपास शंभर वर्षांच्या या संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांचा मोठा वाटा आहे. भारतातल्या विविध भागांतील शास्त्रज्ञांनी यामध्ये खूप मेहनत घेतली आहे. आगामी काळात या संशोधनाचे फायदे आपल्याला पहायला मिळतील. आयुकाने यासंबंधीचा प्रस्ताव खूप वर्षांपूर्वी मांडला होता. मात्र, इतर शास्त्रज्ञांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नव्हते. परंतु डॉ. धुरंधर आणि त्यांच्या सहकार्यांनी चिकाटीने या संशोधनावर काम केले.”
“संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मराठी जनमानसांत विज्ञान रुजविण्यासाठी वर्षभर प्रगत तंत्रज्ञानाविषयीची व्याख्याने आयोजिली आहेत. आपली मराठी भाषा आणि विज्ञान याचा मेळ घालून दोन्ही गोष्टी समृद्ध करण्याचे कार्य परिषदेच्या वतीने केले जात आहे. तज्ज्ञांची व्याख्याने, वैज्ञानिक वर्षासहल, पारंपरिक विज्ञान संकलन, विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रकाशन, विज्ञान रंजनस्पर्धा, मराठी विज्ञान संमेलन, वैज्ञानिक कथालेखन कार्यशाळा आदींचा यामध्ये समावेश आहे,” यशवंत घारपुरे यांनी सांगितले.

विनय र. र. यांनी प्रास्ताविक केले. नीता शहा यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
-------------